हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करत धुळप पिता-पुत्राने जिंकली मने
रत्नागिरी:
आजच्या धावपळीच्या युगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणाऱ्या घटना दुर्मिळ होत चालल्या आहेत. मात्र, रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात राहणाऱ्या उपेंद्र दादू धुळप आणि त्यांचा मुलगा शिवम उपेंद्र धुळप यांनी आपल्या प्रामाणिक कृतीतून माणुसकीचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे. रिक्षेत किंवा रस्त्यावर सापडलेले पाकीट मालकापर्यंत पोहोचवून त्यांनी ‘माणुसकी जिवंत आहे’, हे सिद्ध केले आहे.
श्री. उपेंद्र धुळप हे एका किराणा मालाच्या दुकानात काम करतात. कामावरून घरी परतत असताना त्यांना मारुती मंदिर परिसरात एक पाकीट सापडले. या पाकिटात महत्त्वाची कागदपत्रे आणि काही रक्कम होती. कोणताही मोह न बाळगता, उपेंद्र धुळप यांनी तत्काळ आपला मुलगा शिवम याच्या मदतीने हे पाकीट नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्याकडे विश्वासाने सुपूर्द केले.
पाकीट मिळाल्यानंतर नगरसेवक अमित वसंत विलणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यातील कागदपत्रांच्या आधारे पाकीट कुणाचे आहे, याचा शोध घेतला. हे पाकीट सौ. सुमित्रा अरविंद पावसकर यांचे असल्याचे स्पष्ट झाले. सौ. पावसकर या सध्या मुंबई येथे वास्तव्यास असल्याने, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक ओळख पटवून नातेवाईकांनी हे पाकीट सुखरूपपणे स्वीकारले.
उपेंद्र धुळप आणि शिवम धुळप यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल आणि सामाजिक बांधिलकीबद्दल नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी घुडेवठार येथील नागरिक, मुकुंद विलणकर, मच्छिंद्रनाथ नागवेकर, कमलाकर जोशी, श्रीमती विजया घुडे, सौ. आसावरी पावसकर, सौ. अनिता खानविलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी धुळप पिता-पुत्रांच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले. समाजात आजही प्रामाणिकपणा जपणाऱ्या व्यक्तींमुळे माणुसकीचे मूल्य टिकून आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.