रत्नागिरी शहरवासीयांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15 मिनिटांची पाणी कपात
दर सोमवारी पाणी पुरवठा राहणार बंद – नगराध्यक्ष
रत्नागिरी:- महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन विचारात घेता, रत्नागिरी शहरातील पाणीसाठा आगामी एप्रिल-मे महिन्यांपर्यंत पुरवण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या निर्देशानुसार शहरात दर सोमवारी संपूर्ण शटडाऊन (पाणीपुरवठा बंद) घेण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात येत असालीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आले की, गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी शीळ धरणातील पाणीसाठ्यात काहीशी घट झाली आहे. सध्या शीळ धरणात ३.३२७ दशलक्ष घनमीटर (९९.७३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत १ टक्क्याने साठा कमी आहे. रत्नागिरी शहरासाठी दररोज २० एमएलडी पाणी उपसा केला जातो. दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्यास महिन्याला सुमारे ८० एमएलडी पाण्याची बचत होणार असून शासनाच्या १० टक्के पाणीकपातीचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.
शहराला भीषण पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी नगरपरिषदेकडून पर्यायी जलस्रोत शोधून ते कार्यान्वित केले जात आहेत. यामध्ये शीळ येथील जॅकवेल जवळील जुनी विहीर स्वच्छ करून व बांधून घेऊन ती पुन्हा वापरात आणली जाईल, ज्यामुळे एका पंपाचे पाणी अतिरिक्त उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय दुर्लक्षित राहिलेला नाचणे तलाव गाळ काढून व स्वच्छ करून नॅचरल झऱ्यांचा वापर केला जाईल. तसेच मिरजोळे येथील जुनी विहीरदेखील पुनरुज्जीवित करून शहरासाठी पाण्याचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
पानवल धरणाचे काम पूर्ण झाले असून पानवल ते नाचणे दरम्यानच्या १३०० मीटर लांबीच्या उर्वरित पाईपलाईनच्या कामाला गती दिली जाणार आहे. गॅप फंडिंगमधील निधीतून हे काम मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला आहे. कंत्राटदाराची अडचण दूर करून पुढील दीड ते दोन महिन्यांत पानवल योजनेचे काम पूर्ण करून शहराला मोठा दिलासा देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे असे निमिष नायर यांनी सांगितले.
वाणिज्यिक वापरांवर निर्बंध आणि कठोर पावले
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी व्यावसायिक गाड्या धुण्याची केंद्र (रॅम्प) आणि स्विमिंग पूल यांना नगरपरिषदेकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक कामांसाठी वापर आढळल्यास अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात नळ कनेक्शन खंडित केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांची (बिल्डर्स) बैठक बोलावून इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले जाणार आहे.
रत्नागिरी शहरात सुमारे साडेबारा हजार नळ ग्राहक असून संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करताना वाडी-वस्ती आणि सोसायट्यांच्या आवश्यकतेनुसार वेळेचे नियोजन केले जाईल. शहरवासीयांनी पाण्याचा अपव्यय टाळून अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.