रत्नागिरीला भव्य शैक्षणिक हब बनवण्याचा निर्धार – ना. सामंत
रत्नागिरी
रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत केंद्रीय विद्यालयाचा प्रवेश सोहळा आणि ऐतिहासिक टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे लोकार्पण एकत्र होत आहे. रत्नागिरीसारख्या लहान शहरात केंद्रीय विद्यालय होऊ शकत नाही, अशी टिप्पणी करणाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष काम पूर्ण करून उत्तर दिल्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळा क्र. २ येथे आयोजित या संयुक्त सोहळ्यात जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त के. शंकरय्या, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, मुख्याधिकारी वैभव गारवे, केंद्रीय विद्यालय अंबरनाथचे मुकेश कुमार सिंह आदी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून संदेश दिला.
महाराष्ट्रात यंदा मंजूर झालेल्या अवघ्या तीन केंद्रीय विद्यालयांपैकी एक आपल्या रत्नागिरीला मिळाले आहे. सोमवारी सुरू झालेल्या या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या ७२ तासांत इतके दर्जेदार स्वागतगीत सादर केले, ही या शाळेच्या उच्च गुणवत्तेची पावती आहे, असे कौतुकोद्गार डॉ. सामंत यांनी काढले. पालकमंत्री डाॕ. सामंत म्हणाले, सध्या टिळक विद्यालयाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात शाळा सुरू झाली असली, तरी नाचणे येथील कायमस्वरूपी इमारतीसाठी केंद्र सरकारने तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होत आहे. याबद्दल त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. केंद्रीय विद्यालयात मातृभाषेला प्राधान्य देत मराठी भाषा शिकवली जाईल, असा निर्णय या विद्यालयाने घेतला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या राजकीय प्रवासाची आठवण सांगताना डॉ. सामंत म्हणाले, “२००४ मध्ये आमदार झाल्यापासून स्वतःची एकही खासगी शिक्षण संस्था किंवा कॉलेज उभारले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, बीएससी नर्सिंग, विधी महाविद्यालय, मरीन इंजिनिअरिंग आणि टाटांचे कौशल्य विकास केंद्र यांसारख्या दर्जेदार सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी रत्नागिरीत आणल्या. हे रत्नागिरीचे शैक्षणिक दालन उभारताना सर्वसामान्यांच्या मुलांचे भविष्य घडवणे हाच एकमेव उद्देश राहिला आहे.
शैक्षणिक विकासासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत, “ज्याप्रमाणे नाशिकमध्ये गुंतवणूक आणली, त्याच धर्तीवर ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून कोकणासाठी ५० हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींची कवाडे खुली – खासदार सुनील तटकरे
‘केंद्रीय विद्यालया’मुळे कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि प्रगत युगाला साजेसे शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, असा शुभेच्छा संदेश खासदार श्री. तटकरे यांनी दिला. भारत सरकारच्या धोरणानुसार देशभरात केंद्रीय विद्यालयांची स्थापना केली जात आहे. अशा विद्यालयांमुळे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सहज उपलब्ध होईल. त्याचबरोबर, मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला असल्याने मातृभाषेतून शिक्षण घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उत्तम इंग्रजी शिक्षणाचीही आवश्यकता आहे.गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये ‘कोकण पॅटर्न’ने संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे. विशेषतः कोकणातील मुलींनी बाजी मारून राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. अशा तीव्र स्मरणशक्ती व आकलन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यालय भविष्याची पायाभरणी ठरेल.” केंद्रीय विद्यालयाच्या विकासासाठी अथवा आवश्यक पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांमधून जे काही सहकार्य लागेल, त्यासाठी आपण स्वतः तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार तटकरे यांनी दिली.