चिपळुणात निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ विरोधात महाविकास आघाडी आक्रमक
आमदार भास्कर जाधवांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला विराट महामोर्चा
चिपळूण: मतदार यादीतील वादग्रस्त ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ मंगळवारी महाविकास आघाडीने चिपळूण शहरात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या धडक मोर्चात महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. संपूर्ण मोर्चादरम्यान निवडणूक यंत्रणेच्या विसंगतींवर कडाडून प्रहार करत आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या ‘ज्ञानेशकुमार राजीनामा द्या’ या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण चिपळूण शहर दणाणून सोडले.
आंदोलनाची सुरुवात सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून झाली. पुतळा परिसरात पार पडलेल्या जाहीर सभेत मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी आणि निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लोकशाहीचा गळा घोटणारे अन्याय आपण मुकाटपणे किती दिवस सहन करणार?” असा संतप्त सवाल विचारत त्यांनी, मतदार नोंदणी व यादीतील बदलांच्या गैरवापरातून विरोधकांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात असल्याचा आणि लोकशाही मूल्यांची उघड पायमल्ली सुरू असल्याचा घणाघात केला.
जाहीर सभा आटोपल्यानंतर हा प्रचंड मोर्चा चिंचनाका मार्गे अत्यंत शिस्तबद्धरीत्या प्रांत कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. हातात प्रशासनाविरोधातील फलक घेत मोर्चेकऱ्यांनी केलेल्या तीव्र घोषणाबाजीने हा मार्ग दणाणून गेला होता. प्रांत कार्यालयावर धडक दिल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची थेट भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे राबवण्यात यावी, असा ठाम पवित्रा यावेळी घेण्यात आला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.