डंपरचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ते चांदेराई जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे डंपर चालवून इतर वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू बसप्पा दळवाई (वय २७, मूळ रा. मदगुंदी, ता. मदगुंदी, जि. विजापूर, सध्या रा. कुरतडे, संतोष झोरे यांच्या चिरेखाणीवर, ता. जि. रत्नागिरी) असे संशयित डंपर चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास पोमेंडी बुद्रुक ते चांदेराई जाणाऱ्या रस्त्यावर टिके शिंदेवाडी परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राजू दळवाई हा त्याच्या ताब्यातील कंपनीच्या चॉकलेटी रंगाच्या सहा चाकी डंपरमधून (क्रमांक एमएच ०८ एझेड ४४४१) सदर मार्गावरून जात होता. त्याने वाहन निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा व धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविले या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.