गोदामातून अॅल्युमिनिअम पत्रे व पाईप लंपास
एकावर गुन्हा दाखल; अलोरे कोळकेवाडी येथील घटना
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या सिमेंट गोदामातील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या एका संशयिताविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदामाचे अॅल्युमिनिअम पत्रे आणि लोखंडी पाईप असा एकूण सुमारे १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गणेश प्रकाश कदम (रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
या संदर्भात कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाचे चौकीदार प्रकाश जानू मोहिते (वय ५५, रा. कोळकेवाडी) यांनी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित गणेश कदम याने कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या सिमेंट गोदामाच्या पश्चिमेकडील डाव्या बाजूस लावलेले ८ बाय २.२५ फूट आकाराचे जुने ३९ अॅल्युमिनिअम पत्रे (किंमत सुमारे ११ हजार रुपये) आणि ८ फूट लांबीचे २ इंच गोलाकार असलेले सुमारे १ हजार २०० रुपये किमतीचे ५ जुने लोखंडी पाईप असा एकूण १२ हजार २०० रुपयांचा सरकारी माल फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला.
सदर चोरीची घटना उघडकीस आली तेव्हा कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाचे संबंधित अधिकारी अभिजीत मनोहर पुतके हे रजेवर असल्याने गुन्हा नोंदवण्यास विलंब झाला. अधिकारी रजेवरून कामावर रुजू झाल्यानंतर या चोरीप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज देण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर फिर्यादी प्रकाश मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी गणेश कदम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.