एनसीएमसी कार्ड वाटपात तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
तासनतास ताटकळण्याची वेळ
रत्नागिरी : एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी व कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या तांत्रिक अडचणी व दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. नोंदणी करून महिना उलटून गेला तरी कार्ड न मिळणे, सर्व्हर डाऊन आणि तासनतास रांगेत उभे राहावे लागणे यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवासी उज्ज्वला विपुल गुप्ते यांनी आपला अनुभव सांगताना सांगितले की, एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करून महिना झाला आहे. शनिवारी कार्ड मिळण्यासाठी बोलावले होते, त्यानंतर शुक्रवारी व १४ तारखेला चक्कर मारली असता कार्ड ॲक्टिव्हेट होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून त्या केंद्रावर येऊन थांबल्या आहेत. मात्र, दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांचा नंबर आला नव्हता आणि त्यानंतर कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी गेल्याने सामान्य नागरिकांना ताटकळत राहावे लागले आहे.
दुसऱ्या एका नागरिक मानसी वैद्य यांनी सांगितले की, त्या गेल्या महिन्यापासून कार्ड काढण्यासाठी चकरा मारत आहेत. १५-२० दिवसांपूर्वी आल्या असता सर्व्हर डाऊन असल्याने त्यांची फेरी फुकट गेली होती. सध्या सकाळी ६ वाजेपासून लोक रांगेत येऊन उभे राहत असून, काही नागरिक ११ वाजेपासून रांगेत ताटकळत आहेत. गर्दीच्या वेळी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून काम जलद गतीने व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तासनतास उभे राहावे लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत.
रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकातील केंद्रावरील संथ कारभार आणि तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात असून, प्रशासनाने यावर त्वरित योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून प्रक्रिया वेगवान करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
