डांबरी रस्त्यांच्या गुणवत्तेची होणार तपासणी
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्व डांबरी रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी दिवाळीपूर्वी करण्यात येणार आहे. बांधकाम समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष तथा बांधकाम समितीचे अध्यक्ष विलास चाळके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला चाळके यांच्यासह समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात डीपीसी निधीतून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही रस्ते तर काही महिन्यांतच उखडले गेले आहेत. त्यामुळे सरसकट गुणवत्ता तपासणीचा निर्णय घेण्यात आला.
खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांनाच करावी लागणार आहे. यासाठी त्यांना नोटीस दिली जाणार आहे. जर ठेकेदाराने दुरुस्ती करण्यास नकार दिला, तर त्याला काळ्या यादीत टाकण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय पावसामुळे आणि विविध विकासकामांमुळे रस्ते व महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान होते. मात्र निश्चित धोरण नसल्याने दुरुस्तीची कामे रखडतात. त्यामुळे नगरपरिषदेप्रमाणे जिल्हा परिषदेचेही स्वतंत्र भरपाई व दुरुस्ती धोरण निश्चित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
भुयारी वीज वाहिनीचे काम करताना महावितरणचे मोठे नुकसान झाले असून राजापूर, गुहागर, चिपळूण तालुक्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत महावितरणला आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिल्याचे चाळके यांनी सांगितले.