आजारपण व आर्थिक विवंचनेतून वृद्धाची आत्महत्या
खेड तालुक्यातील कळंबणी येथील घटना
खेड :
खेड तालुक्यातील कळंबणी, थोरेवाडी येथे राहणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्धाने स्वतःच्या राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला रस्सीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वीच्या सुमारास कळंबणी, थोरेवाडी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील मयत भागोजी सखाराम घाणेकर (वय ७६) यांनी राहत्या घराच्या पडवीला असलेल्या लोखंडी खांबाला रस्सीच्या सहाय्याने गळफास घेतला.
मयत व्यक्तीने स्वतःच्या आजारपणाला व आर्थिक परिस्थितीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेची नोंद २१ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.