कोल्हापूर ते रत्नागिरी प्रवास लवकरच होणार सुसाट!
– आंबा–शिये फाटा महामार्गाच्या कामाची डेडलाईन निश्चित
–रत्नागिरी:
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा नागपूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या कामाला आता मोठा वेग आला आहे. विशेषतः कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासाला गती देण्यासाठी आंबा ते शिये फाटा या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम मार्च २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.
रत्नागिरीपासून सोलापूरपर्यंत जाणाऱ्या सुमारे ३८० किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार असून, दोन्ही भागातील कृषी व व्यावसायिक विकासाला नवी चालना मिळणार आहे.
तीन टप्प्यांत सुरू आहे कामाचे नियोजन
कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यानच्या या महामार्गाचे काम प्रामुख्याने मिऱ्या बंदर ते आंबा, आंबा ते पैजारवाडी, पैजारवाडी ते चोकाक या तीन टप्प्यांत विभागण्यात आले आहे.
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मिऱ्या बंदर ते आंबा टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. तर आंबा ते पैजारवाडी टप्प्यात सुमारे ८४ टक्के आणि पैजारवाडी ते चोकाक टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
बोरपाडळे घाटात भव्य उड्डाणपूल
घाटमार्गावरील धोकादायक वळणांना कायमस्वरूपी पर्याय देण्यासाठी आणि रस्ता सुरळीत करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे घाटात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक अत्यंत उंच आणि लांब उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. याठिकाणी दिवस-रात्र काम सुरू असून शेकडो कामगार व भारी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने घाट परिसरातील प्रवास अतिशय सुरक्षित बनवण्याचे काम सुरू आहे.
एकीकडे आंबा–शिये फाटा मार्गाचे काम निश्चित मुदतीत पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, दुसरीकडे शिये फाटा ते सांगली (अंकली) या पुढील टप्प्याबाबत काही आव्हाने कायम आहेत. नवीन ठेकेदाराची नियुक्ती आणि काही क्षेत्रांतील प्रलंबित भूसंपादन प्रक्रिया यामुळे या विभागाच्या वेळापत्रकाबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. प्रशासनाकडून भूसंपादनाचे अंतिम टप्पे व अधिसूचनांची प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी या भागातील कामाला गती मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
हा महामार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कोकणातील आंबा, काजू, मासे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, गूळ, द्राक्षे, डाळिंब यांसारख्या शेतीमालाची वाहतूक अत्यंत वेगवान होईल. तसेच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील पर्यटनालाही मोठी चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला सुवर्णकाळ येईल, अशी अपेक्षा व्यापारी आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.