आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त उपक्रम
रत्नागिरी:
“सुरक्षित किनारपट्टी–समर्थ भारत” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून काम करणाऱ्या सागरी सीमा मंच, रत्नागिरी जिल्हा आणि विविध स्थानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील प्रसिद्ध मांडवी किनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ मोठ्या उत्साहात पार पडले.
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे, सागरी पर्यावरणाचे रक्षण करणे आणि पर्यटनाला चालना देणे या मुख्य उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये सागरी सीमा मंच सोबतच मांडवी पर्यटन विकास सेवा संस्था (मांडवी, रत्नागिरी), लायन्स क्लब (रत्नागिरी), मराठी पत्रकार परिषद (रत्नागिरी जिल्हा), रत्नागिरी शहर व्यापारी संघ आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (रत्नागिरी) यांसारख्या सामाजिक व व्यावसायिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान सहभागी स्वयंसेवकांनी मांडवी किनाऱ्यावरील प्लास्टिक, काच, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ गोळा करून परिसर पूर्णपणे स्वच्छ केला. “स्वच्छ सागर… सुरक्षित सागर… समृद्ध सागर…” या संदेशाचा प्रसार करत नागरिकांमध्ये व पर्यटकांमध्ये सागरी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. पर्यावरण रक्षण आणि किनाऱ्यांचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मत या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले. या अभियानाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
