आंजर्ले तरीबंदरावर येथे भीषण आगीत दोन मासेमारी नौका जळून खाक
दापोली: तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदरावर ग्रामपंचायतीलगत उभ्या असलेल्या मासेमारी नौकांना लागलेल्या भीषण आगीत दोन मासेमारी नौका पूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाळांनी काही काळ संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. मात्र स्थानिक नागरिक, हर्णे व पाजपंढरी परिसरातील मच्छीमारांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आग इतर नौकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून पोलिस पंचनाम्यामध्ये दोन्ही नौकांचे मिळून ६५ लाखाचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ७:३० वाजण्याच्या सुमारास आंजर्ले खाडीकिनारी ग्रामपंचायतीजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या नौकांमधून अचानक धुराचे लोट निघू लागले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दक्षिणेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे ज्वाळा वेगाने पसरू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. खाडीतील खाऱ्या पाण्याचा मारा तसेच फायटर मशीनच्या सहाय्याने खाऱ्या पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी बाजूला असणाऱ्या जयदीप रघुवीर व गजानन तबीब यांच्या नौकाना या आगीची धग लागत होती. त्याचवेळी ग्रामस्थांनी आंजर्ले मधीलच एका जेसीबीला बोलावून घेऊन त्या नौकानां दोरखंडाच्या साहाय्याने आगीपासून थोड्या अंतरावर ओढून घेतल्याने त्या नौकाना वाचवण्यात यश आले.
दरम्यान, दापोली नगरपंचायतीकडून बुलेटवरील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पाठविण्यात आली. तसेच दापोलीत स्वतंत्र अग्निशमन दलाची सुविधा नसल्याने खेड येथून अग्निशमन बंब मागविण्यात आला. मात्र तो येईपर्यंत स्थानिकांनीच शर्थीचे प्रयत्न करून आगीचा फैलाव रोखला. त्यामुळे शेजारी उभ्या असलेल्या अनेक मासेमारी नौका सुरक्षित राहिल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले.
या आगीत हर्णे येथील प्रवीण यशवंत रघुवीर (वय ५५) यांच्या मालकीची ‘पूर्णिमा’ (नोंदणी क्र. IND-MH-4-MM-951) ही सहा सिलेंडरची मासेमारी नौका, त्यावरील जाळी व इतर मासेमारी साहित्य पूर्णपणे जळून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच जगन्नाथ पोशिराम पावसे यांच्या मालकीची ‘तेजस्विनी’ (नोंदणी क्र. IND-MH- 4-MM -4594) ही सहा सिलेंडरची नौका व त्यावरील मासेमारी साहित्य जळून सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. एकूण ६५ लाख रुपयांच्या नुकसानीची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी प्रवीण यशवंत रघुवीर यांनी दिलेल्या खबरीवरून दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पंचनामा व तपासानंतरच जळीतामागील कारण समोर येणार आहे. या घटनेमुळे आंजर्ले, हर्णे आणि परिसरातील मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मत्स्य व्यवसायाशी संबंधित सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्यामध्ये कुठेही आग लागली तरी खेड नगरपरिषदेचा बंब बोलवावा लागतो. शासनाकडे एका सुसज्ज बंबाची अनेक वेळा मागणी करून सुद्धा बंब उपलब्ध होत नाही याबाबत स्थानिकांकडून खंत व्यक्त केली जात आहे.