आंबव येथे गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव हनुमान स्टॉप परिसरात बंद हॉटेलच्या पाठीमागील शेडजवळ गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबव हनुमान स्टॉप येथील हॉटेल ड्रायव्हर डेलिकेशन हे बंद असलेल्या हॉटेलच्या पाठीमागे शेडच्या बाजूला ओंकार हरिशचंद्र सुर्वे (वय ३०, व्यवसाय किराणा दुकान, रा. निवे बुद्रुक, सरोदेवाडी, ता. संगमेश्वर) आणि अजित उर्फ आऊ अनंत चव्हाण (वय ५५, व्यवसाय वेल्डिंग, रा. देवरुख मच्छी मार्केटजवळ, ता. संगमेश्वर) हे गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन नामदेव कामेरकर यांनी फिर्याद दिली असून, १७ सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ नुसार गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.