परतीसाठी दोन हजार लालपरीचे आरक्षण फुल्ल
एसटी सज्ज : अडीच हजार बसेस मुंबईकडे होणार रवाना
रत्नागिरी
गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात वाजतगाजत लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन केले असून, आतापर्यंत २ हजार बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे ज्या गणेशभक्तांनी तिकीट काढले नाही त्यांनी तातडीने ऑनलाईन तिकीट काढावे, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात प्रत्येक कोकणकर आपल्या मूळगावी नक्की येतो. यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणार आहे. तीन दिवसात तब्बल ३ हजार एसटी बसेसने लाखोंच्या संख्येने चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. वर्षभर बंद असलेली घरे कोकणकरांनी उघडली असून, गर्दीने गावे गजबजली आहेत. दरम्यान, लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांना मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी परतीचे वेध लागत असतात. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्यावतीने २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन केले आहे.
मागील २० दिवसांपूर्वीच एसटी बसेसचे आरक्षण खुले केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत २ हजार एसटी बसेस बुक झाल्या असून, त्यापैकी ८०० बसेस ग्रुप बुकिंगच्या आहेत. आणखी काहीच बसेस शिल्लक असून, लवकरात लवकर प्रवाशांनी तिकीट बुकिंग करावे असे आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले.