रत्नागिरीत ‘स्वयं’ उपक्रमातून विचारांची श्रीमंती वाढविण्याचा समर्थ इन्व्हेस्टमेंट्सचा पुढाकार
प्रशांत गाडे, चिन्मय गवाणकर आणि बाळासाहेब कापसे यांच्याशी डॉ. उदय निरगुडकर साधणार संवाद
रत्नागिरी : आर्थिक समृद्धीसोबतच रत्नागिरीची वैचारिक आणि बौद्धिक समृद्धी वाढावी, नव्या कल्पना, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सामाजिक संवेदनशीलतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रत्नागिरीकरांचा थेट संवाद नागरिकांशी घडावा, या उद्देशाने समर्थ इन्व्हेस्टमेंट्सच्या पुढाकाराने ‘स्वयं रत्नागिरी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, रत्नागिरी येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांत स्वतःची अनोखी वाट निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांशी रत्नागिरीकरांना थेट संवाद साधण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.
या कार्यक्रमात प्रशांत गाडे, चिन्मय गवाणकर आणि बाळासाहेब कापसे सहभागी होणार असून, प्रसिद्ध मुलाखतकार डॉ. उदय निरगुडकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
तंत्रज्ञानाला माणुसकीची जोड देत प्रशांत गाडे यांनी आतापर्यंत सुमारे २० हजार दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात उपलब्ध करून दिले आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ नवनिर्मितीसाठी न करता एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलण्यासाठी कसा करता येतो, याची प्रेरणादायी कहाणी ते या संवादातून मांडणार आहेत.
चिन्मय गवाणकर हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगाकडे कसे पाहावे, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसाय, शिक्षण आणि दैनंदिन जीवनात कोणते बदल घडत आहेत, तसेच भविष्यातील संधी आणि आव्हाने कोणती असतील, याबाबत त्यांचा दृष्टिकोन यावेळी जाणून घेता येणार आहे.
तर ‘कापसे पैठणी’चे संस्थापक बाळासाहेब कापसे यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक पैठणी कलेला आधुनिक उद्योजकतेची जोड दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी १०० हून अधिक मूकबधिर विद्यार्थ्यांना पैठणी विणण्याचे कौशल्य शिकवून त्यांना स्वावलंबनाचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. परंपरा, उद्योग आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या कार्यातून पाहायला मिळतो.
विद्यार्थ्यांसाठी सकाळी विशेष संवाद
याच दिवशी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रत्नागिरीतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात प्रशांत गाडे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान केवळ शिकण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग समाजातील समस्या सोडवण्यासाठी कसा करता येतो, एखाद्या कल्पनेचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत कसे करता येते आणि तरुण वयात आपल्या ज्ञानाला सामाजिक उद्देशाची जोड कशी देता येते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
‘आपल्या ज्ञानाचा उपयोग एखाद्याचे आयुष्य बदलण्यासाठी कसा करता येईल?’ हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे हा या विशेष सत्राचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आर्थिक संपत्तीबरोबरच विचार, ज्ञान, अनुभव आणि नव्या कल्पनांची श्रीमंतीही तितकीच महत्त्वाची आहे, या भूमिकेतून ‘स्वयं रत्नागिरी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.