चिपळुणात २५ हजार ३८६ मतदारांची नावे वगळली
विशेष सखोल पुनरीक्षण; ३० पर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची मुदत
चिपळूण: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघातील २५ हजार ३८६ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. मृत, स्थलांतरित, दुबार किंवा दीर्घकाळ अनुपस्थित असलेल्या मतदारांच्या नोंदींच्या पडताळणीत ही नावे समोर आली आहेत. मात्र, यातील पात्र मतदारांना आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची संधी देण्यात आली असून ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
चिपळूण विधानसभा मतदारसंघात चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ३३६ मतदान केंद्रांचा समावेश असून, पुनरीक्षणापूर्वी मतदारसंख्या २ लाख ७१ हजार ४३३ होती. यामध्ये १ लाख ३८ हजार ६७५ महिला आणि १ लाख ३२ हजार ७५८ पुरुष मतदारांचा समावेश होता. विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम चिपळूण मतदारसंघाने राज्यात सर्वप्रथम १०० टक्के पूर्ण केले होते.
प्रारूप मतदार यादीत नाव आढळले नाही किंवा मतदाराच्या नाव, पत्ता, वय अथवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास संबंधितांना दुरुस्तीची संधी आहे. नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, चुकीची किंवा आक्षेपार्ह नोंद वगळण्यासाठी नमुना ७, तर नाव, पत्ता आदी तपशील दुरुस्त करण्यासाठी नमुना ८ भरता येणार आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी मतदार यादीतील नोंदींची स्वतंत्र यादीही जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.
टेरव बुद्रुकचा आदर्श
मतदार यादी पुनरीक्षणाच्या या प्रक्रियेत चिपळूणने राज्यात विशेष कामगिरी केली आहे. तालुक्यातील टेरव बुद्रुक हे महाराष्ट्रातील १०० टक्के पुनरीक्षण पूर्ण करणारे पहिले गाव ठरले. गावातील १९५ मतदारांच्या नोंदींची तपासणी करताना दोन मृत, पाच दुबार आणि एक कायमस्वरूपी स्थलांतरित मतदाराची नोंद आढळली होती.