चिपळूणात दोन एसटी बसेसची भीषण धडक
चालकासह २७ प्रवासी गंभीर जखमी, गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी):
आंबडस ते चोरवणे मार्गावर खांदाट गवळवाडी फाट्याजवळ दोन एसटी बसेसमध्ये समोरासमोर अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून, चालकासह तब्बल २७ प्रवासी लहान-मोठ्या स्वरूपात गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चालक नागेश रामचंद्र कदम (वय ५१, रा. माखजन बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) हे आपली एसटी बस (क्रमांक MH-20-BL-4034) घेऊन चिपळूण ते चोरवणे अशा मार्गाने जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने कासई ते चिपळूण जात असलेली एसटी बस (क्रमांक MH-14-BT-2674) समोरून आली. या बसचा चालक राहुल लक्ष्मण पवार (वय ३८, सध्या रा. एस.टी. डेपो चिपळूण, मूळ रा. आसनगाव, ता. जि. सातारा) याने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता आपली बस अतिवेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसेसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात फिर्यादी चालक नागेश कदम यांच्यासह वाहक संजय गोपीनाथ आडे, वाहक विकास भगत रगड आणि प्रवासी सवर्णा चव्हाण, मनोहर चव्हाण, मनिषा लाड, सुनिता सनगरे, सोनल खेतले, सुजाता धनावडे, विजया जंगम, विठ्ठल धाडवे, तुकाराम हिरवे, पार्थ नांदगावकर, संतोष कदम, मुकुंद पालांडे, श्रुती जंगम, जानकी गोरखे, अनंत उत्तेकर, सुहासिनी शिंदे, वृषाली तांबे, सुनंदा कदम, जयवंत पालांडे, सीयान कदम, विद्या भुवड, नितेश धाडवे, निधी धाडवे आणि ओम शिंदे असे एकूण २७ जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी चालक नागेश कदम यांच्या तक्रारीवरून अविचाराने व वेगाने गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी चालक राहुल पवार याच्याविरोधात चिपळूण पोलिसांत गुन्हा नोंद क्रमांक २४६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.