न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलची 5 वर्षांची परंपरा कायम
संगमेश्वर पोलिसांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी साजरे केले रक्षाबंधन
संगमेश्वर : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून समाजातील परस्पर विश्वास, सुरक्षितता, प्रेम आणि बंधुभाव दृढ करणारा सण आहे. याच भावनेतून न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेड बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी यंदाही संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. शाळेने सुरू केलेली ही आगळीवेगळी सामाजिक उपक्रमाची सहा वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली.
दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्य बजावणाऱ्या या रक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने शाळेने हा उपक्रम सुरू केला आहे.
यंदाही विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने संगमेश्वर पोलीस ठाण्यात भेट देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच समाजाच्या रक्षणासाठी ते करीत असलेल्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या प्रसंगी पोलीस ठाण्यातील वातावरण काही काळ भावनिक आणि आनंददायी झाले.
यावेळी संगमेश्वर पोलीस निरीक्षक मितीश केनी यांनी न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण केवळ पारंपरिक पद्धतीने न साजरा करता समाजासाठी कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांसोबत साजरा करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
“पोलीस आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी भूमिका असते. विद्यार्थ्यांनी पोलिसांबद्दल व्यक्त केलेला आदर आणि आपुलकी निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे पोलीस निरीक्षक मितीश केनी यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना जोपासावी, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना समाजातील विविध घटकांशी असलेले आपले नाते समजून घेण्याची संधी मिळते. पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे अधिकारी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेले समाजाचे रक्षणकर्ते आहेत, हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर या उपक्रमातून बिंबविण्यात आला.
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक बांधिलकी, देशप्रेम, पर्यावरणप्रेम आणि समाजातील विविध घटकांप्रती आदराची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. रक्षाबंधनानिमित्त पोलिसांना राखी बांधण्याचा उपक्रम त्याच सामाजिक जाणीवेचा एक सुंदर नमुना आहे.
सहा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबद्दल आदराची भावना निर्माण झाली असून, पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील स्नेहबंध अधिक घट्ट करण्यासाठी शाळेचा हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरत आहे.
राखीच्या एका धाग्यातून विश्वासाचे नाते;
विद्यार्थ्यांनी संगमेश्वर पोलिसांना दिला सुरक्षित समाजाचा संदेश!
या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा सण अधिक अर्थपूर्ण ठरला असून, “समाजाचे रक्षण करणाऱ्या हातांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे” ही न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलची सहा वर्षांची परंपरा भविष्यातही अशीच सुरू राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी उपाध्यक्ष सलाउद्दीन बोट,सचिव राजेश आंबेकर, मुख्याध्यापिका नाझीमा बांगी उपमुख्याध्यापिका सुजन अलजी, समीक्षा फेपडे , वृषभ खंदारे,सर्व विद्यार्थिनी, पोलिस बांधव उपस्थित होते