रत्नागिरी कस्टम्स विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम
पांढरा समुद्र, मुरुगवाडा जेटी परिसरात किनारा स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न
रत्नागिरी:
पर्यावरण संरक्षण आणि समुद्रकिनाऱ्यांचे आरोग्य जपण्याच्या ध्येयाने पुणे कस्टम्स आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी कस्टम्स विभागाच्या वतीने गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरीतील प्रसिद्ध पांढरा समुद्र आणि मुरुगवाडा जेटी परिसरातील किनाऱ्यावर ही मोहीम धडाक्यात पार पडली.
या उपक्रमात रत्नागिरी कस्टम्स विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन श्रमदान केले.
गेल्या काही दिवसांत किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिकचा कचरा, टाकाऊ पॉलिथिन पिशव्यासह इतर टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या किनारी भागाची दुरवस्था दूर करून तो स्वच्छ आणि सुंदर बनवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
कस्टम्सच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे काहीच वेळात कचऱ्याने व्यापलेला समुद्रकिनारा पूर्णपणे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी स्वरूपात उजळून निघाला.
या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रत्नागिरी कस्टम्स विभागाने केवळ किनारा स्वच्छ केला नाही, तर नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृतीचा एक सशक्त संदेशही दिला. “किनाऱ्यावरून उचललेला कचऱ्याचा प्रत्येक तुकडा हे आपल्या महासागरांच्या सुरक्षेच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे,” या भावनेतून हे अभियान यशस्वीरीत्या राबवण्यात आले.
समुद्रातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागून किनाऱ्यावर कचरा करू नये, असे आवाहनही या प्रसंगी कस्टम्स प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. शासकीय विभागाच्या या प्रत्यक्ष कृतीमुळे स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी रत्नागिरी कस्टम्स विभागाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.
