पाली-घडशीवाडीत घरासमोरून दुचाकी चोरी
२३ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास ; ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी
जिल्ह्यात पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट कायम असून, आता या चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पाली-घडशीवाडी येथे घरासमोर पार्क केलेली सुमारे २३ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही चोरी पाली-घडशीवाडी येथील चंद्रकांत घडशी यांच्या सुमित्रा चाळ परिसरात गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री ते शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत सचिन शिवाजी गोंधळी (वय २६, रा. पाली-घडशीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गोंधळी यांनी बुधवारी (ता. १९) रात्री आपल्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच-०८ एव्ही ४२९२) सुमित्रा चाळ येथील राहत्या घरासमोर पार्क केली होती. त्यानंतर ते घरात गेले. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते घराबाहेर आले असता, ज्या ठिकाणी दुचाकी पार्क केली होती त्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही.
आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यानंतरही दुचाकीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुचाकी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील संभाव्य ठिकाणे तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.