न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंत्री मंडळाचा शपथविधी उत्साहात
प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत लोकशाही मूल्यांचा जागर
संगमेश्वर : न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेड बुद्रुक येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि निर्णयक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय मंत्री मंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
शाळेच्या मंत्री मंडळाची निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सहभागातून लोकशाही पद्धतीने राबविण्यात आली. मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडल्याबद्दल प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच संस्थेचे विशेष कौतुक केले. शालेय स्तरावर अशा प्रकारे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेचा अनुभव देणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर जबाबदारी आणि सेवाभाव असल्याचे सांगितले. शालेय मंत्री मंडळातील विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्याची भावना आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवनिर्मिती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल ही नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असून शिक्षणाबरोबरच सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा आणि विविध समाजोपयोगी क्षेत्रात संस्था कार्यरत असल्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
अपघाताच्या काळात मदतीला धावणारी संस्था म्हणून नवनिर्मिती फाउंडेशनची ओळख
यावेळी आरटीओ निरीक्षक भाग्यश्री पाटील यांनीही नवनिर्मिती फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. नवनिर्मिती फाउंडेशन ही केवळ शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नसून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रियपणे सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारी संस्था म्हणून नवनिर्मिती फाउंडेशनची ओळख निर्माण झाली आहे, असे भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले. समाजाच्या गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असून संस्थेचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्यजित भोसलेची हेड बॉयपदी बिनविरोध निवड
शाळेच्या मंत्री मंडळाच्या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रक्रियेत सत्यजित भोसले याची शाळेच्या हेड बॉयपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच्यासह विविध जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी यावेळी पदाची शपथ घेतली.
नवनिर्वाचित मंत्री मंडळाने शाळेची शिस्त, स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या समस्या, विविध शालेय उपक्रम तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व, नेतृत्व, जबाबदारी आणि लोकशाही व्यवस्थेची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. त्यामुळे हा शपथविधी सोहळा विद्यार्थ्यांसाठी केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा उपक्रम ठरला.
यावेळी हेडबॉय म्हणून सत्यजित भोसले, हेड गल मर्जिया केळकर, कॅप्टन रुजदा बोट, अंश साळसकर, गार्गी जाधव, आरोग्यमंत्री महेक कापडे, विराज मुळ्ये, सर्वेश मयेकर, सांस्कृतिक मंत्री दामिनी मेस्त्री, आफिया आंबेडकर, या विद्यार्थ्यांना जबाबदारी देण्यात आली.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापिका नाझीमा बांगी ( गोलंदाज),उपमुख्याध्यापिका सुजन अलजी, वृषभ खंदारे, सिमरन मालदार, असिफा मालगुडकर कुदसिया मोडक, समीक्षा फेपडे, महेक बोट,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच आरटीओच्या वाहतूक निरीक्षक भाग्यश्री पाटील,RTO श्री.मोहिते, नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, उपाध्यक्ष सलाउद्दीन बोट ,उपाध्यक्ष वासू काका लिंगायत,जमुरत अलजी, ओंकार वीरकर, निलेश जाधव शकील डिंगणकर, व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष अझरुद्दीन जांबारकर, मेहराज आंबेडकर, अब्बास आंबेडकर, तैमूर अलजी, गणेश जोशी,
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी नव्या जबाबदारीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करण्याच्या निर्धाराने झाला.