ओमळी गावकरवाडीत अजगराचा थरार; वनविभागाने केले जेरबंद
चिपळूण : ओमळी गावकरवाडी येथे आज सकाळी अजगराने मांजरावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर अजगराने जवळच असलेल्या सविता कदम यांच्या लाकडाच्या माचीत आश्रय घेतला.
घटनेची माहिती मिळताच सावर्डे येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजगराला शिताफीने जिवंत पकडले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य धोका टळला असून, ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले.