भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर:
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे सीमेचीवाडी उतरण येथे भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत गिक्सर मोटारसायकलवरील चालक जागीच मयत झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे ताम्हाणेचे पोलीस पाटील संतोष अनंत जाधव (वय ३८, रा. ताम्हाणे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मयत प्रतिक प्रमोद सावंत (वय ३३, रा. आंबवली मराठवाडी, ता. संगमेश्वर) हे आपल्या ताब्यातील गिक्सर एस.एफ. मोटारसायकल (क्र. MH-46 AQ-2060) वरून देवरुख-कोसुंब मार्गे ताम्हाणे रोडने जात होते. ते ताम्हाणे सीमेचीवाडी उतरण येथे आले असता, समोरून येणाऱ्या ट्रकच्या (क्र. MH-07-1170) चालकाने ताम्हाणे ते कोसुंब या अरुंद रस्त्यावर आपला ट्रक हयगयीने, निष्काळजीपणाने व वेगात चालवून समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात मोटारसायकलचालक प्रतिक प्रमोद सावंत यांना गंभीर दुखापत होऊन ते जागीच मयत झाले.
याप्रकरणी ट्रक चालक बाबासाहेब सुखदेव साठे (वय ४४, रा. साडवली तुळजाभवानी नगर, ता. संगमेश्वर) याच्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.