राहत्या घरी आगीत भाजल्याने गृहिणीचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील नाना देसाईवाडी येथील घटना
राजापूर:
राजापूर तालुक्यातील नाना देसाईवाडी येथील ४१ वर्षीय गृहिणीचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. प्रणाली प्रभाकर पातले (वय ४१ वर्षे, व्यवसाय: गृहिणी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्या राहत्या घरी आगीत भाजल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:३४ वाजता कोल्हापूर येथील शासकीय सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:४५ वाजता त्या मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या घटनेची खबर मृत महिलेचे नातेवाईक रोहन प्रभाकर पातले यांनी दिली असून, या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.