आंबा घाटातून गणेशोत्सवापूर्वी वाहनांसाठी मार्ग मोकळा होणार
आ. किरण सामंत आणि दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पाहणी
रत्नागिरी:-
अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून रस्ता खचला. अनेक ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या समवेत प्रत्यक्ष आंबा घाटाची पाहणी केली.
गणेशोत्सवाच्या तोंडावर व्यापारी वर्गाची चिंता
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक खंडित झाल्यामुळे व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवाहतुकीचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. साखरपा, कोंडगाव, दाभोळे, संगमेश्वर, देवरुख आणि पाली परिसरातील व्यापारी वर्गाची यामुळे मोठी गैरसोय होत असून, आंबा घाटातून मालवाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
सुरक्षिततेला प्राधान्य देत पर्यायी व्यवस्थेचे संकेत
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, आमदार किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. रस्त्याची तांत्रिक सुरक्षितता आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन, चारचाकी व सहाचाकी छोट्या मालवाहू वाहनांसाठी सुरक्षिततेच्या निकषांनुसार पर्यायी व्यवस्था करता येईल का, यावर बैठकीत विचारविनिमय झाला. रस्त्याची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही जीविताला धोका निर्माण न करता, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनासोबत मिळून तांत्रिक अहवालाच्या आधारे लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आ. सामंत यांनी यावेळी संांगितलंe.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय उपस्थिती
घाटाच्या तांत्रिक तपासणी आणि पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी, रत्नागिरी मनोज जिंदल, जिल्हाधिकारी, कोल्हापूर डॉ. विजय राठोड, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र करपे, उपपोलीस अधीक्षक सुरेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, तहसीलदार अमृता साबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महामार्ग विभागाचे सर्व संबंधित तांत्रिक अधिकारी
नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे वेधलेले लक्ष
कोकणातून कोल्हापूरकडे आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे होणारी मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर आंबा घाटावर अवलंबून आहे. त्यामुळे अवजड वाहनांवरील बंदीमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. आता प्रशासकीय पाहणीनंतर आणि तांत्रिक अहवालानंतर गणेशोत्सवापूर्वी छोट्या मालवाहू वाहनांसाठी हा घाट सुरू होतो का, याकडे संपूर्ण संगमेश्वर, देवरुख, साखरपा आणि पाली परिसरातील नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिली आहे.