सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; विविध कार्यक्रमांचे आयोजन
घुमटकर ग्रुपचे सदस्य नौशाद अब्दुल वाहिद भोबंल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी : सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीमय आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गुंबद मोहल्ला, सैतवडे येथील सामाजिक कार्यकर्ते, घुमटकर ग्रुपचे सदस्य नौशाद अब्दुल वाहिद भोबंल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नौशाद भोबंल यांना स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान स्वीकारण्याची विनंती केली असता, त्यांनी संस्थेच्या विनंतीचा मान राखत तत्काळ होकार दिला. नोकरीनिमित्त दुबई येथे वास्तव्यास असलेले नौशाद भोबंल सध्या सहकुटुंब सुट्टीसाठी मुंबई येथे आले असल्याचे समजताच संस्थेच्या वतीने त्यांना गुंबद-सैतवडे येथे येऊन ध्वजारोहण करण्याची विनंती करण्यात आली.

संस्थेच्या या विनंतीला मान देत, मुंबई येथे असतानाही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सहकुटुंब गुंबद-सैतवडे गाठले आणि शाळेच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून आपल्या शुभहस्ते ध्वजारोहण केले. त्यांच्या या कृतीतून गाव, शाळा आणि समाजाप्रती असलेली त्यांची आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी प्रकर्षाने दिसून आली.
विद्यार्थिनींच्या क्रीडा प्रगतीसाठी विशेष योगदान
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नौशाद अब्दुल वाहिद भोबंल यांनी शाळेतील मुलींच्या क्रिकेट संघाला तसेच बॅडमिंटन संघाला आवश्यक क्रीडा साहित्य भेट दिले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना विविध क्रीडा क्षेत्रांत उत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने त्यांनी केलेले हे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे.
याचप्रसंगी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना कॅडबरी चॉकलेट आणि ज्यूस चे वाटप करून स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला. त्यांच्या या प्रेमळ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला आणि देशभक्तीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
नोकरीच्या व्यस्ततेतून वेळ काढून संस्थेच्या विनंतीला मान देत सहकुटुंब सैतवडे येथे उपस्थित राहून ध्वजारोहणाचा मान स्वीकारल्याबद्दल, तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य, चॉकलेट्स आणि ज्यूसचे वाटप करून त्यांच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल दि मॉडेल इंग्लिश स्कूल व मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे यांच्या वतीने नौशाद अब्दुल वाहिद भोबंल यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन करण्यात आले.
त्यांचे हे योगदान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारे प्रेरणादायी कार्य म्हणून निश्चितच स्मरणात राहील.