रत्नागिरी पोलीस दलातील १२ अधिकारी व अंमलदारांना सेवा पदक जाहीर
रत्नागिरी:
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारच्या गृह विभागाकडून विशेष पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एक एकूण १२ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. यामध्ये ८ जणांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ तर ४ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित मुख्य स्वातंत्र्यदिन सोहळ्यात या सर्व गुणवंत अधिकारी व अंमलदारांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ व निष्कलंक कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हे सन्मान जाहीर केले जातात. यंदा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातून ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ मिळवणाऱ्यांमध्ये लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन दत्तात्रय ढेरे, पोलीस मुख्यालयाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. काशिनाथ महादेव गुरव, लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय शिवाजी साळवी, जिल्हा विशेष शाखेच्या महिला पोलीस हवालदार निशा दीपक केळकर, पोलीस मुख्यालयाच्या महिला पोलीस हवालदार वैदेही विनोद कदम, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार महेश दगडू गुरव आणि लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशिष वसंत शेलार यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे पोलीस दलात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झालेल्यांमध्ये राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित आनंदराव यादव, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद भगवानराव मेंगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विजय तानाजी आंबेकर आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अमोल अरुण ढमरे यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कायदा, सुव्यवस्था आणि तपासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, त्यांच्या या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य पदक प्रदान सोहळ्यात या सर्व सन्मानप्राप्त अधिकारी व अंमलदारांना अधिकृतपणे हे पदक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी या सर्व पदकप्राप्त सहकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.