चिपळूणमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा
भेंडीनाका परिसरात एकावर कारवाई
चिपळूण:
चिपळूण शहरातील भेंडीनाका परिसरात बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर चिपळूण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०९ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास भेंडीनाका येथील एका फ्रेश चिकन शॉपच्या मागील बाजूला असलेल्या पर्त्याच्या शेडजवळ आरोपी अक्षय बारक खेडेकर (वय ४३, रा. कामथे, माटेवाडी, चिपळूण) हा मुंबई मटका जुगाराच्या शुभ अंकावर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीची खातरजमा करून चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपी मटका जुगार खेळवताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ६२० रुपये रोख रक्कम आणि इतर जुगार साहित्याचा समावेश आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वृशाल सगुण शेटकर (बक्कल नं. ११५१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी अक्षय खेडेकर याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २०६/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.