मिरजोळे पाटीलवाडीत अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा
६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी :
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरजोळे, पाटीलवाडी येथील नदीकाठी जंगलमय भागात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत विनापरवाना गावठी दारू आणि रसायन तयार करणारे ६७ हजार ८०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मिरजोळे, पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय आणि झाडीझुडूपांच्या भागात हा छापा टाकण्यात आला. आरोपी संदीप वसंत जाधव (वय ४९, रा. घर नं. २६९, मिरजोळे, बौद्धवाडी, रत्नागिरी) याने नदीकाठच्या भागात विनापरवाना व बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी गुळ-नवसागर मिश्रीत रसायन आणि दारू गाळण्याचे साहित्य स्वतःच्या फायद्यासाठी बाळगल्याचे व दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले.
जप्त केलेल्या मुद्देमालात रसायनाने भरलेले मोठे बॅरल (डेगासह), गुळ-नवसागर मिश्रीत गरम कुजके रसायन, तयार रसायन व ७ बॅरल, रसायनाचे १८ प्लॅस्टिक कॅन्स, तयार गावठी दारू, भांडी व इतर साहित्य याचा समावेश आहे. एकूण ६७,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन प्रभाकर डोमणे यांनी फिर्याद दिली असून, आरोपी संदीप वसंत जाधव याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ब), (क), (ड), (फ), (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.