रुद्र सेवा फाऊंडेशनतर्फे कर्जतमधील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य
डोंबिवली:
“हसतील डोळे, फुलेल बालपण; जेव्हा मिळेल शालेय साहित्याचे दान” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवणारा एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम नुकताच पार पडला. रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिना’चे औचित्य साधून रुद्र सेवा फाऊंडेशन, डोंबिवली तर्फे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गुढवण येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या विशेष उपक्रमांतर्गत गुढवण आणि रामाची वाडी या ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवे कोरे साहित्य हातात पडताच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हाच या संपूर्ण उपक्रमाची खरी पावती आणि कामाचे चीज झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली. यानंतर शाळेचे निलेश ठोंबरे सर आणि इतर शिक्षकवृंदाच्या वतीने रुद्र सेवा फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव श्री राजेंद्र वाळके यांनी रुद्र सेवा फाऊंडेशनची स्थापना, तिची कार्यपद्धती आणि मुख्य उद्देश याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. समाजोपयोगी उपक्रमांची साखळी अखंड ठेवण्याचा संस्थेचा मानस त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी फाऊंडेशनच्या इतर मान्यवरांनीही उपस्थितांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मोल समजावून सांगितले. आपल्या खुसखुशीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “शिक्षण हीच प्रगतीची खरी वाट आहे” हा मोलाचा संदेश देत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणे आणि गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणे हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम प्रसंगी दोन्ही शाळांमधील शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीने रुद्र सेवा फाऊंडेशनच्या या औदार्याबद्दल आणि सामाजिक जाणिवेबद्दल मनापासून आभार मानले. रुद्र सेवा फाऊंडेशनचा हा उपक्रम केवळ शालेय साहित्याचे वाटप करण्यापुरता मर्यादित नसून, दुर्गम भागातील अनेक छोट्या-छोट्या स्वप्नांना पंख देऊन त्यांना मोठी उंची देण्याचा एक सुंदर व कौतुकास्पद प्रयत्न ठरला आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाला रुद्र सेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, दोन्ही शाळांचे शिक्षकवृन्द, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
