नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने एनसीएमसी कार्ड नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी (प्रतिनिधी) : एस.टी. प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना ‘एनसीएमसी’ कार्ड सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगरसेवक सौरभ सुरेश मलुष्टे यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय एनसीएमसी कार्ड नोंदणी कॅम्पला नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या विशेष शिबिराचा तब्बल ४५० ते ५०० महिला व ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण शेठ सामंत, नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, शिवसेना पदाधिकारी राहुल पंडित, बिपीन बंदरकर, बंड्याशेठ साळवी तसेच महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शासनाच्या विविध सवलतींचा लाभ एस.टी. प्रवासात सहज मिळावा यासाठी हे कार्ड गरजेचे असते. मात्र, अनेकांना ते काढण्यासाठी दूर जावे लागते किंवा तांत्रिक अडचणी येतात. हीच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी थेट प्रभागातच ही सुविधा उपलब्ध करून दिली. आपल्या दारातच कार्ड नोंदणीची सोय झाल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या लोकोपयोगी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
सहकार्य आणि संयोजन
या नोंदणी कॅम्पला समृद्धी सर्व्हिसेसचे संदीप चव्हाण व स्नेहा चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी चिनार आचरेकर, शिवराज पाटील, अभिषेक सुर्वे, दिनेश जठार, चिनार प्रसादे, योगेश विरकर, तृप्ती विरकर, तेजल पाटील, सुनील बेंडखळे, राजा बामणे, अविनाश भोसले, सुरज सावंत, दीपक मेस्त्री, प्रेमराज फोडकर यांच्यासह ‘सौरभ मलुष्टे मित्र मंडळाचे’ सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“प्रभागातील नागरिकांना शासकीय योजना व सुविधांचा लाभ सहज आणि आपल्याच परिसरात मिळावा, यासाठी अशा प्रकारचे लोकउपयोगी उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.”
— सौरभ सुरेश मलुष्टे (नगरसेवक)