सह्याद्री प्राथमिक शाळेचे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत
श्लोक शिंदे आणि मिन्सा तांबे यांचे उज्ज्वल यश!
सावर्डे:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेच्या अंतिम निकालात शाळेचे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले असून, त्यांनी शाळा आणि परिसराच्या लौकिकात मोलाची भर घातली आहे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शलोक सूरज शिंदे याने तब्बल २७० गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. या गुणांच्या जोरावर त्याने रत्नागिरी जिल्ह्यात चौथा तर चिपळूण तालुक्यात दुसरा क्रमांक पटकवण्याचा पराक्रम केला आहे. तर दुसरीकडे, मिन्सा अबुबकर तांबे या विद्यार्थिनीने २५२ गुण मिळवत ग्रामीण सर्वसाधारण विभागात संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला असून, ती जिल्ह्यात १२ व्या स्थानी आली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सावर्डे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूणचे आमदार तथा सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधरा राजेशिर्के, प्रशांत निकम, डॉ. इसहाक खतीब, शांताराम खानविलकर, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडीक, मारुतीराव घाग, गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे आणि महेश महाडीक यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शकील मोडक, रसिका सुर्वे, प्रणित राजेशिर्के आणि श्रुती कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे.
