सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, : तालुक्यातील चाफे-देणवाडी तसेच धामणसे तेलीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या प्रौढ व तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बाळू गोताड (वय ४८, रा. चाफे-गोताडवाडी, रत्नागिरी) व अथर्व शिवाजी जोशी (वय २३),आणि अजित अनंत रेवाळे (वय २५, दोघे ही रा. मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी, रत्नागिरी) अशी संशयित तीन मद्यपींची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. ९) सकाळी साडेअकरा व रात्री आठच्या सुमारास चाफे-देणवाडी व धामणसे तेलीवाडी सोमगंगा नदीचे किनारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गोताड हे रस्त्याच्या बाजूला दगडावर बसून देशीदारुची बाटली पुढ्यात ठेवून दारु पिण्याच्या उद्देशाने निदर्शनास आले. तर संशयित तरुण अथर्व जोशी व अजित रेवाळे हे तेलीवाडी सोमगंगा नदीचे किनारी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल बाळू गिते व स्वप्नील तेरवणकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तीन मद्यपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.