जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी, जुलै महिन्यात झालेल्या धुवाधार पावसाने जून महिन्यातील पावसाची तूट (बॅकलॉक) पूर्णपणे भरून काढली आहे. १ जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १७ हजार १८६ मि.मी. म्हणजेच ५६.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत १५ हजार ८५२ मि.मी. (५२ टक्के) पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ४ टक्के अधिक पाऊस पडला आहे.
यंदा मान्सून वेळेवर दाखल होऊनही सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. जून महिन्यात अवघे चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. परिणामी पिके पिवळी पडू लागली होती आणि शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले होते. जून महिन्यात जिल्हयातील अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आणि मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले.
या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट तर टळलेच, शिवाय खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ५२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात, नाचणीची पेरणी आणि पुनर्लागवड यशस्वीरीत्या पूर्ण झाली. भातशेतीसाठी अत्यंत पूरक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तसेच नद्या, नाले आणि धरणे तुडुंब भरल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होऊन टँकर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
एकंदरीत उशिरा सुरू झालेला मान्सून जुलै महिन्यात कोकणासाठी वरदान ठरला आहे. मात्र, जुलै महिन्यात धो-धो कोसळल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. धरणे व नद्यांमध्ये पुरेसा साठा असला तरी शेती व एकूणच पाणीसाठ्याच्या स्थिरतेसाठी आगामी काळात आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचे व्यक्त होत आहे.