धामणसेतील सोमगंगा नदीवरील पूल ठरतोय पर्यटकांचे आकर्षण
रत्नागिरी ः धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील बहुप्रतिक्षीत हटवाडी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, या प्रकल्पामुळे धामणसे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. निसर्गरम्य वातावरण, सोमगंगा नदीचे सौंदर्य आणि पुलामुळे उपलब्ध झालेली दळणवळणाची सुविधा यामुळे हा परिसर पर्यटकांचे नवे आकर्षण केंद्र बनला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येथील व्हिडिओ व फोटो प्रचंड व्हायरल होत असून, कोकणातील हे नवे जलपर्यटन स्थळ म्हणून वेगाने उदयास येत आहे.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले होते. पावसाळ्यात ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर व्हावी आणि जलसंधारणासोबत ग्रामीण विकासाचे मॉडेल उभे राहावे, हा त्यांचा मानस या निमित्ताने साकार झाला आहे. पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यातून, तसेच जिल्हा नियोजन समिती व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सोमगंगा नदीतील गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले. यामुळे नदीची जलधारण क्षमता वाढून पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या जलसंधारणाचा प्रत्यक्ष फायदा परिसरातील शेती आणि विहिरींना झाला आहे.
रत्नागिरी-लांजा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी नुकतीच या स्थळाला भेट देऊन पाहणी केली व सोमगंगा नदीच्या पात्रात पोहण्याचा आनंद घेतला. या परिसराच्या पर्यटन विकासासाठी आर्किटेक्टच्या माध्यमातून आराखडा तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनीही या जलपर्यटन स्थळाला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
दरम्यान, ॲड. दीपक पटवर्धन आणि अनिकेत पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली धामणसेचे सुपुत्र व माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी, सरपंच अमर रहाटे, मुकुंद जोशी, अविनाश जोशी, अविनाश कुलकर्णी आणि नगरसेविका मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले. या पुलाचे बांधकाम प्रसिद्ध ठेकेदार राजेश रमाकांत मुकादम यांनी अत्यंत दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण केले.
या प्रसंगी उपसरपंच सौ. ऋतुजा उमेश कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी धनावडे, मुकुंद (बाळासाहेब) जोशी, माजी सरपंच अविनाश जोशी, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन करमरकर, रत्नागिरीच्या नगरसेविका सौ. मानसी करमरकर, विश्वास धनावडे, तन्मय जोशी, राजू डाफळे, विनायक भुवड, धनराज पवार यांच्यासह ग्रामस्थ आणि सुमारे पाचशे ते सातशे पर्यटक उपस्थित होते.
चौकट १
रोजगाराच्या नव्या संधी
“हटवाडी पूल हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक अर्थकारणाला चालना देणारा टप्पा आहे,” असा विश्वास उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. या पर्यटनस्थळामुळे स्थानिक महिला बचतगटांनी पुलाजवळ वडापाव, भजी, चहा, मिसळ अशा खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केले असून, महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
चौकट २
पर्यटकांना सुरक्षितता व स्वच्छतेचे नियम
“सोमगंगा नदी परिसर हा निसर्गाने दिलेला सुंदर ठेवा आहे. पर्यटकांनी पाण्याचा अंदाज घेऊनच पोहण्याचा आनंद घ्यावा,” असे आवाहन सरपंच अमर रहाटे यांनी केले. तसेच, “पर्यटनस्थळी मद्यपान, धूम्रपान, गांजा किंवा अमली पदार्थांचे सेवन करणे आणि कचरा टाकणे पूर्णपणे वर्ज्य आहे. असे कृत्य आढळल्यास थेट पोलिस कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.