बारा गुरांना बेशुद्ध करून तस्करीचा प्रयत्न
आंजर्ले-आडेफाटा येथील घटना : दोघे ताब्यात; तस्करीचा डाव असल्याचा संशय
दापोली
तालुक्यातील आंजर्लेजवळ आडेफाटा येथे ७ ऑगस्ट रोजी रात्री रस्त्यावर असलेल्या १२ गुरांना पावामधून गुंगीचे औषध तसेच इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुरांना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा डाव असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी नुरमोहमद इसाक कच्छी (पनवेल) आणि अमन मुर्तुजा घारे (गुहागर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी प्रमोद भागणे यांनी दापोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार आंजर्ले आडेफाटा परिसरात असताना दोन चारचाकी वाहने तेथे आली. या वाहनांमधील व्यक्ती रस्त्यावर असलेल्या गायी, बैल आणि पाडी यांना काहीतरी खायला घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित हालचालींकडे लक्ष दिले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार काही वेळानंतर रस्त्यावर असलेली गुरे निपचित अवस्थेत पडलेली दिसून आली. काही गुरे बेशुद्धावस्थेत असल्याचेही आढळले. संबंधित गुरांना पावामधून गुंगीकारक औषध देण्यात आल्याचा तसेच त्यांना इंजेक्शन देण्यात आल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे गुरांना बेशुद्ध करून पुढे त्यांना वाहनांमधून नेण्याचा, अर्थात तस्करी करण्याचा प्रयत्न असावा, असा संशय निर्माण झाला.
दरम्यान, या हालचालींचा संशय तक्रारदाराला झाल्याने संबंधितांचा कथित डाव फसल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारदाराने घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दापोली पोलिसांनी तत्काळ संबंधित वाहनांचा शोध सुरू केला. तक्रारीत नमूद असलेल्या एमएच-०१-इएम-६१०४ व एमएच-४८-डीक्यू-४४१६ या वाहनांचा शोथ घेतला असता ती वाहने दापोली येथील नेशमन कॉलनी परिसरात आढळून आली. त्यामध्ये दोन व्यक्ती आढळून आल्याचे ‘एफआयआर ‘मध्ये नमूद आहे.
या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, गुरांना कोणते पदार्थ देण्यात आले, त्यांना इंजेक्शन कोणी व कशासाठी दिले तसेच गुरांना कुठे नेण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. या घटनेबाबत कळताच आंजर्ले येथील सुधीर भागणे, ओमकार कोरडे, प्रथमेश केळसकर, वैभव आरेकर, अभिनय केळसकर, मंदार कोरडे, शैलेश पेटकर, सुरज रहाटवळ, अभिषेक पालशेतकर, अजिंक्य केळसकर, सुशांत भाटकर, मकरंद म्हादलेकर व पोलीस पाटील जगदीश कलमकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दापोलीतील अक्षय फाटक, पप्पू रेळेकर, रोहन केळसकर यांच्यासह अनेक जागरुक नागरिकांनी दापोली परिसरात फरार गाड्यांचा शोध घेतला. तसेच याकामी पशुवैद्यकीय अधिकारी राहुल अन्नमवार यांनी गुरांना वाचवण्यासाठी तातडीने सलाईन व औषधे देऊन मोठे सहकार्य केले.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११ (१) (क), भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२५ आणि कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुरांना देण्यात आलेल्या पदार्थांचे स्वरुप आणि त्याचा त्यांच्या प्रकृतीवर झालेला परिणाम स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यक असल्यास नमुन्यांची तपासणी होणे महत्त्वाचे आहे. पोलिस तपासातूनच गुरांना बेशुद्ध करण्यामागील नेमका उद्देश आणि या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.