जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांमध्ये १५ हजार नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ
रत्नागिरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना” नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महिनाभरात संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे २०० शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, यातून जवळपास १५ हजार नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयाने, तसेच जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या महाशिबिरांचे यशस्वी नियोजन करण्यात आले.
या शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने पूर्ण शरीर तपासणी, महत्त्वाच्या रक्तचाचण्या, ईसीजी आणि BMI तपासणी. हाडे, मेंदू आणि मणक्यांच्या आजारांबाबत विशेष तपासणी. कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांचे निदान, मधुमेह आणि पायाच्या आजारांबाबत समुपदेशन. लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया. गर्भावस्थेतील तपासण्या, समुपदेशन आणि लसीकरण. लेप्टोस्पायरोसिस आजाराबाबत जनजागृती व तपासणी. मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया.
शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी. याशिवाय, विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमधून ३५० हून अधिक रक्तपिशव्यांचे यशस्वी संकलन करण्यात आले.