रघुवीर घाटात भीषण भूस्खलन; महामार्ग दरीत कोसळला, १५ गावांचा संपर्क तुटला!
खेड | प्रतिनिधी) :
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन होऊन महामार्गाची एक बाजू थेट दरीत वाहून गेली आहे. घाटातील अनेक ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे १५ गावांचा संपर्क तुटला आहे. या अभूतपूर्व घटनेमुळे घाटातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घाट परिसरातील डोंगराची माती मोठ्या प्रमाणात सैल झाली होती. बुधवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसानंतर अचानक अनेक ठिकाणी मोठे भूस्खलन झाले. या भूस्खलनात महामार्गाचा मोठा भाग खचून थेट दरीत वाहून गेला, तर घाटातील विविध ठिकाणी प्रचंड दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला. अनेक ठिकाणी रस्त्यावर माती आणि दगडांचे मोठे ढिगारे साचल्याने संपूर्ण घाट धोकादायक बनला आहे.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, महामार्गाचा मोठा भागच वाहून गेल्यामुळे केवळ दरड हटवून वाहतूक सुरू करणे शक्य नसून रस्त्याची नव्याने उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्ववत होण्यासाठी पुढील काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री रघुवीर घाटातील मुसळधार पावसाचा रौद्र अवतार आणि भीषण भूस्खलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये घाटातील धोकादायक परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीचे भीषण चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, या धोकादायक परिस्थितीनंतरही पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आणि तरुण रघुवीर घाटाकडे जात असल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाळ्यात धबधबे, निसर्गसौंदर्य आणि धुक्याचा आनंद घेण्यासाठी रघुवीर घाटात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक असून दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे पर्यटकांनी या मार्गावर जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि रघुवीर घाटातील धोकादायक परिसरात वर्षा पर्यटनावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
प्रशासनाकडूनही नागरिकांना आणि पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, घाटातील परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.