रनपच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटी कामगाराचा मृत्यू: विषारी घोणसच्या दंशामुळे दुर्दैवी अंत
रत्नागिरी: नगरपालिकेच्या उद्यान विभागातील हलगर्जीपणा आणि सुरक्षेच्या साधनांचा अभाव एका निष्पाप कंत्राटी कामगाराच्या जिवावर बेतला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर साफसफाईचे काम करत असताना विषारी घोणस सापाने केलेल्या दंशामुळे कंत्राटी कर्मचारी काशिनाथ लक्ष्मण गोताड (४५) यांचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ठेकेदाराचा नफेखोर स्वभाव यामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेला असून, या दुर्दैवी घटनेने शहरात तीव्र संताप उसळला आहे.
महसूल मंत्र्यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जवाहर क्रीडांगणावर भव्य मंडप उभारणीचे नियोजन सुरू होते. या कार्यक्रमाच्या तयारीचा एक भाग म्हणून परिसराची स्वच्छता करण्याचे काम काशिनाथ गोताड यांना सांगण्यात आले होते. अवघ्या वीस दिवसांपूर्वीच ते रत्नागिरी नगरपालिकेच्या उद्यान विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाले होते. गुरुवारी दुपारी ते संरक्षण भिंती शेजारील झाडी तोडत असताना तिथे लपलेल्या अत्यंत विषारी घोणस सापाने त्यांना दंश केला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून, ते फगरवटार येथे राहतात.
या घटनेनंतर प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. नियमानुसार कोणत्याही कंत्राटी कामगाराला सुरक्षेसाठी रबरी बुटांपासून (गमबूट) ते हातमोज्यांपर्यंत (हॅन्ड ग्लोज) आवश्यक ती सर्व सुरक्षा उपकरणे पुरवणे कंत्राटदाराची कायदेशीर जबाबदारी असते. मात्र, येथील संबंधित ठेकेदाराने गोताड यांना कोणतीही सुरक्षिततेची साधने दिली नव्हती. साधी सुरक्षेची साधनेही न पुरवता कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार ठेकेदारावर सदोष वधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
घटना समजताच नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे, वरिष्ठ लिपिक जितेंद्र विचारे आणि आरोग्य विभागाचे निरीक्षक संदेश कांबळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र, पालिका प्रशासनाने भरला असता आणि नियम पाळण्यास भाग पाडले असते, तर आज काशिनाथ गोताड यांच्यावर मृत्यूची वेळ आली नसती. प्रशासनाच्या वरदहस्तामुळेच ठेकेदार अशा प्रकारे कामगारांच्या सुरक्षिततेशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.