७५ वर्षांची परंपरा कायम: बनवाडी, सैतवडे येथे आषाढी एकादशी उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न
रत्नागिरी:
बनवाडी, सैतवडे येथे गेली सुमारे ७५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली आषाढी एकादशीची पवित्र परंपरा यंदाही शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरी करण्यात आली. दिवसभरातील विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे संपूर्ण बनवाडी परिसर विठ्ठलमय झाला होता.
उत्सवाची सुरुवात पहाटेच्या सुमारास अत्यंत प्रसन्न वातावरणात काकड आरतीने झाली. त्यानंतर परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीनुसार भोवत्या पार पडल्या. सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, सैतवडे आणि न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येत एक भव्य साक्षरता दिंडी काढली. हातात टाळ-मृदंग आणि साक्षरतेचा संदेश देणारे फलक घेऊन निघालेल्या या दिंडीने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराला भेट दिली. मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल रुक्मिणी’च्या नामाचा गजर करत साक्षरतेचा प्रचार व प्रसार करणारे एक प्रभावी पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे आणि सहभागामुळे उत्सवाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक रंग प्राप्त झाला.
सकाळच्या सत्रात श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळाच्या सुमधुर भजनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय करून सोडले. यानंतर ह.भ.प. सत्यवान महाराज कदम यांचे प्रभावी कीर्तन पार पडले. आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीतील कीर्तनातून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुपारच्या सत्रात सिद्धिविनायक भजन मंडळ (वाटद सुतारवाडी) आणि श्री दयानंद मेस्त्री (मेर्वी) यांनी आपल्या भजनांच्या माध्यमातून हरिनामाचा अखंड गजर केला.
सायंकाळच्या सत्रात बनवाडी महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. महिलांच्या भजनातील उत्कटतेने कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली. रात्रीच्या वेळी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची पारंपरिक प्रदक्षिणा पार पडली, ज्यामध्ये अबालवृद्धांसह हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी संपूर्ण परिसर “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” आणि “माऊली” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
दिवसभरात श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दानशूर व्यक्तींचे सहकार्य आणि मंडळाच्या वतीने अल्पोपहार व प्रसादाचे नियोजनबद्ध वाटप करण्यात आले.
या ७५ व्या वर्षाच्या उत्सवात गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक, विद्यार्थी आणि बालकांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त सहभागातून ग्रामएकता, दृढ श्रद्धा आणि निसिम भक्तीचे दर्शन घडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख नियोजन व उत्कृष्ट आयोजन श्री विठ्ठल रखुमाई मंडळ, बनवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले तसेच बनवाडीची ही समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा भविष्यातही अशीच अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
