निवळी – कोकजेवठार येथे टेम्पोच्या धडकेत इनोव्हा कारचा अपघात
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरी :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी कोकजेवठार येथे टेम्पोने मारलेल्या धडकेत इनोव्हा क्रिस्टा कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास बावनदी ते हातखंबा जोडणाऱ्या महामार्गावर निवळी कोकजेवठार येथे घडला. खबर देणारे मंदार भार्गव निमकर (वय ४०, रा. नाचणे, रत्नागिरी) हे आपली इनोव्हा क्रिस्टा कार (क्र. MH 08 AN 3020) घेऊन देवरूख-आंबव मार्गे रत्नागिरीच्या दिशेने येत होते. सोबत साक्षीदार अजिंक्य एकनाथ मोरे हे देखील होते.
कार निवळी फाट्यावरून जात असताना, समोरून येणाऱ्या टेम्पोच्या (क्र. MH 40 DC 2032) चालकाने आपले वाहन भरधाव वेगात, बेपरवाहीने आणि निष्काळजीपणे चालवून इनोव्हा कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.
या अपघाताप्रकरणी पोलीस हवालदार रुपेश रघुनाथ भोसले (वय ४१, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, टेम्पो चालक सूरज सुरेश वाढवे (वय २६, रा. पिंपरी गोडवाना, जि. नागपूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.