आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत भक्तिमय वारी
पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या फुगडीने वेधलं लक्ष
विवेक पाटील यांनी फुगडी घालत लुटला वारीचा आनंद
रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त आज रत्नागिरीत सकल हिंदू समाजाकडून आज मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर दरम्यान पारंपरिक वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या भक्तिमय वारीमध्ये हजारो नागरिक आणि वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखत असतानाच पोलिसांमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक रूप या वारीदरम्यान पाहायला मिळालं. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनीही या वारीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारीच्या आनंदात तल्लीन होत त्यांनी इतर वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत वारीचा आनंद लुटला. पोलिसांच्या या साध्या आणि जनमानसात मिसळणाऱ्या रूपामुळे नागरिकांमधून त्यांचं कौतुक होत आहे. या सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणामुळे रत्नागिरीतील आषाढी एकादशीचा सोहळा अधिकच स्मरणीय ठरला.