
सर्पदंशाने दगावलेल्या मुलीच्या मृत्यूची होणार चौकशी
गुहागर: वेळास येथील 13 वर्षांची इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या मुग्धा बटावळे हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आरोग्य अधिकाऱ्यांकडून तात्काळ त्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्पदंशानंतर व्यक्तींना ठराविक वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे दुर्देवी प्रकार यापूर्वीही घडले आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात टोकाला असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास या ठिकाणी घडली आहे. मुंबईतून मे महिन्याच्या सुट्टीला गावी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळची मंडणगड तालुक्यातील वेळास येथील असलेली मुग्धा राकेश बटावळे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. ती विरार येथील इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती.
बटावळे कुटुंबीय नोकरीनिमित्त मुंबई विरार येथे स्थायिक आहेत. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे हे कुटुंब गावाकडे आलं होतं. दोन दिवसांपूर्वी मुग्धा सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास बाथरूमसाठी घराबाहेर गेली. लहान असलेली मुग्धा घराबाहेर गेली आणि इथेच मोठा घात झाला. तिला विषारी सापाने दंश केला. तिला तातडीने सरकारी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथेच तिचा मृत्यू झाला. मुलीला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
वेळास गावच्या 13 वर्षीय मुलगीला वेळेवर उपचार न मिळाल्याने सर्पदंशाने मरण पावली आहे. ग्रामीण आरोग्य केंद्राची बिकट अवस्था अशा आशयाचा व्हॉट्अप संदेश या कार्यालयाकडे प्राप्त झालेला आहे. तरी सदर विषयाबाबत चौकशी करणेत येवून अहवाल या कार्यालयाकडे उलट टपाली सादर करण्यात यावा, असा आदेश मंडणगडचे तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांनी दिला आहे.