
आरवली येथे गडनदी पात्रात बुडून प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील आरवली गुरववार्डी येथे गडनदी पात्रात बुडून कर्नाटक येथील ५७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
संगमेश्वर पोलिसांच्या माहितीनुसार, पांडू झापू पवार (रा. कर्नाटक, सध्या रा. आरवली गुरववाडी, ता. संगमेश्वर) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
पांडू पवार हे कामानिमित्त आरवली गुरववाडी येथे गडनदीकिनारी झोपडीमध्ये राहत असत. त्यांना दारूचे व्यसन होते. गडनदीपात्रामध्ये रात्री- अपरात्री ते आंघोळीसाठी जात असत. मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास पवार हे आंघोळीसाठी गडनदीपात्रात गेले असता पाण्यात बुडून मृत झाले. ही बाब सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संगमेश्वर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.