
कोळंबे सिद्धार्थ नगर मध्ये बिबट्याचा पाच वर्षाच्या गाईच्या वासरावर हल्ला …
संगमेश्वर :कोळंबे सिद्धार्थ नगर परिसरामध्ये बिबट्याचा सतत दिवसा तसेच रात्री मुक्त संचार होताना दिसत आहे. दि.22 -2-2024 रोजी रात्री कोळंबे सिद्धार्थ नगर मध्ये दीपक सीताराम कांबळे यांच्या पाच वर्षाच्या पाडी वरती बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा बळी गेला आहे . तसेच या परिसरात वारंवार अनेक पाळीव प्राण्यांवर सतत बिबट्याचा हल्ला होत आहे. दि. 15 -2 – 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता सुनील कांबळे यांच्या कुत्र्याला बिबट्याने जखमी केले तसेच या काही दिवसांपूर्वी पाळीव शेळयांवरती सुद्धा हल्ले केले होते.
बिबट्याच्या या सतत मुक्त संचारमुळे पाळीव प्राण्यांना तसेच मानवी जीवनाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे.यामुळे ग्रामस्थ अतिशय भयभीत झाले आहेत. तरी ग्रामस्थांच्या वतीने सतत या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामपंचायत तसेच वनविभागाला करण्यात येत आहे.
सदरच्या घटनेनंतर आज कोळंबे सिद्धार्थ नगर मध्ये गावचे सरपंच रघुनाथ पडवळ, पोलिस पाटील टाकळे ,संगमेश्वर देवरुख वनविभाग अधिकारी आर. डी. पाटील उपस्थित होते त्याच प्रमाणे कोळंबे आंबेकर वाडी, चव्हाण वाडी, सुतार वाडी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांची मागणी एक च होती की बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे .