
संस्कृतीच्या गोष्टी आम्हाला शिकवू नये- डॉ. विनय नातू
गुहागर: भाजपाच्या संस्कृतीवर बोलताना आपण स्वत: देवळामध्ये वापरलेली भाषा आठवा. पोलीसांना उद्देशून केलेली वक्तव्य आठवा. तुम्ही यापूर्वी भाजपवरती, भाजपच्या नेत्यांची जाहीर सभेत केलेली टिंगलटवाळी आठवा. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. यातून तुमची प्रवृत्ती आणि संस्कृती कोकणाला समजायला लागली आहे. असे प्रत्युत्तर माजी आमदार व गुहागर विधानसभा अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिले.
गुहागरच्या सभेत निलेश राणेंनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर वैयक्तिक टिका केली. त्याबाबत बोलताना सध्याच्या भाजपची ही संस्कृती झाली आहे. असा आरोप आमदार जाधव यांनी केला. त्याला डॉ. नातूंनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा नेता जिल्ह्यात अगर तालुक्यात येतो त्यावेळी त्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी एकत्र येतात. या स्वागत कार्यक्रमाला अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणीही सर्वसाधारणपणे बोलावत नाही. नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यातही त्यांच्या स्वागताकरीता अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावले नव्हते. यात गैर काहीही नाही. परंतु हेतुपुरस्सर एखाद्या नेत्याला त्याच्या सभेला पोचू द्यायच नाही. त्यासाठी काहीतरी घडवायचे. त्यासाठी जिल्ह्याभरातील कार्यकर्त्यांना एकत्र बोलवायचे. त्यांच्यासमोर चिथावणीखोर भाषण करायच. ही प्रवृत्ती त्या नेत्याची संस्कृती सांगून जाते.
पोलीसांना मध्ये घेवून ज्या पध्दतीने आपण बोललात ते एका आमदाराला शोभत नाही. रस्त्यावर येवून, बॅरिकेटसवर चढण्याचा प्रयत्न करणे आमदाराला शोभत नाही. यांच्या कार्यालयात दगड गोळा केलेले असतात. यांचे शहरप्रमुख दगड फेकताना दिसतात. गुहागरच्या सभेला जाण्यात अडचणी निर्माण केल्या जातात. सर्व घटना घडून गेल्यावर भावनिक भाषा वापरुन सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न करायचा. याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही विचार करावा. संस्कृतीच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. कोकणातील सामान्य जनतेला या सर्व गोष्टी कळु लागल्या आहेत. असेही यावेळी डॉ. विनय नातू यांनी सांगितले