
नातेवाइकानेच मारला दागिण्यांवर डल्ला
राजापूर भटाळी येथील घरफोडी प्रकरणात एकजण अटकेत
राजापूर (प्रतिनिधी):
शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार पंडीत यांचे समर्थनगर येथील रहाते घर फोडून झालेल्या चोरी प्रकरणी तपास लावण्यात राजापूर पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी मुद्देमालासह रत्नागिरी व राजापूर पोलीसांनी एकाला ताब्यात घेत अटक केली आहे . सुवेध किशोर कुळकर्णी (३४) राहणार मिठगवाणे राजापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे .
सुवेध कुळकर्णी हा पंडीत यांच्या नातेसंबधातील असल्याची माहिती पुढे आली आहे. रत्नागिरी व राजापूरातील सुवर्णकारांच्या सतर्कतेमुळे या चोरीतील हा संशयीत आरोपी जेरबंद होण्यास मदत झाली आहे.
शनिवारी २० जानेवारी रोजी हा चोरीचा प्रकार घडला होता. प्रकरणी विजयकुमार पंडीत यांनी राजापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील अनंत करंबेळकर यांच्या निवासात पंडीत हे गेली कित्येक वर्षे भाडयाने रहातात. शनिवारी दुपारी २.३० वाजता विजयकुमार पंडीतही घर बंद करून कळसवली येथे गेले होते. रात्री ९.३० ते ९.४५ वाजण्याच्या दरम्यान ते परत आपल्या या भटाळी येथील घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे कळून आले होते. घरातील कपाटातील सुमारे ४ लाख ३० हजार ४१५ रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार श्री. पंडीत यांनी पोलिसांत दिली होती. चोरटयाने कटरच्या सहाय्याने दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करत कपाट चावीने उघडून कपाटातील हा ऐवज लांबविला होता.
दरम्यान एकूणच या चोरी प्रकरणानंतर माहितगार व्यक्तीनेच हा प्रकार केल्याचा कयास होता, तो खरा ठरला आहे. पोलीसांनी ज्या संशयीताला जेरबंद केले आहे तो पंडीत यांच नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे.
गेले दोन दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासणे व अन्य तपास पोलीसांकडून सुरू होता. मात्र चोरी प्रकरणात काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. अखेर मंगळवारी या प्रकरणी तपासात पोलीसांना यश आले आहे. चोरीतील दागिने रत्नागिरीत बँकेत गहाण ठेवण्यासाठी हा संशयीत आरोपी गेला आणि अलगद पोलीसांच्या सापळयात अडकला आहे.
सुवर्णकारांच्या सतर्कतेमुळे चोर रंगेहाथ जेरबंद
दरम्यान रत्नागिरीतील सराफ संघटनेचे अध्यक्ष संतोष खेडेकर व राजापूरचे सुवर्णकार व व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या सतर्कतेमुळे चोर तात्काळ जेरबंद होण्यास मदत झाली आहे. सदर व्यक्ती ही हे चोरलेले दागिने रत्नागिरीतील एका खासगी बँकेन गहाण ठेवण्यासाठी गेली होती, तेथून त्यांना मुल्यांकणासाठी सोनाराकडे पाठविण्यात आले. दरम्यान राजापुरातील या चोरी प्रकरणानंतर पोलीसांनी सुवर्णकारांना एक पत्र देऊन अशा प्रकारे कोण दागिने विक्रीसाठी आले तर पोलीसांना कळवावे असे पत्र दिले होते. हे पत्र मालपेकर यांनी रत्नागिरी जिल्हा सुवर्णकार ग्रुपवरही शेअर केले होते. त्यामुळे मुल्यांकणासाठी आलेले दागिने हे राजापुरातील चोरीतील असल्याचा दाट संशय आल्याने तात्काळ रत्नागिरीतील सुवर्णकारांनी राजापुरात मालपेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मालपेकर यांनी तात्काळ राजापूर पोलीसांत याबाबत माहिती दिली. तसेच पंडीत यांनाही दागिन्यांचे फोटो दाखवून हे दागिने त्यांचे आहेत काय याबाबत खात्री करण्यात आली. ते पंडीत यांचेच होते, तात्काळ रत्नागिरी व राजापूर पोलीसांनी संशयीत आरोपी सुमेध कुळकर्णी याआ रंगेहाथ मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली आहे . सायंकाळी त्याला राजापूर पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेशन विभाग रत्नागिरीचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुबीन शेख करत आहेत.
दरम्यान या संपुर्ण प्रकरणात आरोपीला जेरबंद करण्यात राजापूर येथील ए डी मालपेकर ज्वेलर्स चे मालक व राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांचा डिवायएसपी यशवंत केडगे यानी शाल श्रीफळ देवुन सत्कार केला आहे . यावेळी राजापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अविनाश केदारी , पीएसआय मोबीन शेख , चालक प्रसाद शिवलकर , पोलिस शिपाइ अनिल केसकर, दिपक काळे , किरण सपकाळे , नितीन भोगले , सचिन वीर आदी पोलिस कर्मचारी व अधिकारी हजर होते.