
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी केला महाविकास आघाडीचा निषेध
रत्नागिरी :उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी कामगार भरतीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला. याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन व महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करत दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली तसेच महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. जयस्तंभ येथे सकाळी तासभर हे आंदोलन करण्यात आले. तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीचा धिक्कार असो, माफी मागा उद्धव ठाकरे माफी मागा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला. नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची घोर फसवणूक थांबणार आहे. हा अन्याय दूर केल्याबद्दल सर्व सुशिक्षित तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज आभार मानले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले, कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्याचे पुरावे कालच आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ही कंत्राटी भरती रद्द करत असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर आव्हाड यांनीही हा आमचा निर्णय होता, असे जाहीर केले. पण खोटे बोला; पण रेटून बोला या उक्तीप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते टीका करत होते; परंतु आता भरती रद्द करण्यात आली असून, यामुळे तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळेल. आंदोलनात अशोक मयेकर, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, शहराध्यक्ष राजन फाळके, सुजाता साळवी, ढेकणे, सोनाली आंबेरकर, प्राजक्ता रूमडे, संकेत कदम, विक्रम जैन, सुशांत पाटकर, उमेश देसाई, डॉ. हृषिकेश केळकर, मनोज पाटणकर, मंदार मयेकर, दादा ढेकणे, शैलेश बेर्डे, लक्ष्मण लिंगायत, संतोष बोरकर लीलाधर भडकमकर, अशोक वाडेकर आदी उपस्थित होते.