
आयुष्मान भारत अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची होणार आरोग्य तपासणी
रत्नागिरी ः केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर या कालावधीत देशभरात आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध आठल्ये यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
आयुष्मान भव मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा, रक्तदान मोहिम, अवयदान जनजागृती मोहीम, वय वर्षे 18 वरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत सेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आशा यांनी गृहभेटी देऊन उपशामक सेवा आवश्यक असलेल्या रूग्णांचा शोध घेऊन या सेवा देण्यात येतील. दि.17 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर या कालावधीत आयुष्मान भवः सेवा पंधरवडा राबविण्यात येईल. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिरे, अवयवदानाची प्रतिज्ञापत्रे करून घेतली जाणार आहेत. आयुष्यमान आपल्या दारी 3.0 या मोहिमेंतर्गत आयुष्यमान भारत, आभा कार्ड यांची नोंदणी केली जाणार आहे. असंसर्गजन्य आजार तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी मोहीम माता-बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, सिकलेस तपासणी व नेत्ररोग चिकित्सा तपासणी व नाक व घसा तपासणी केली जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत शासकीय, खाजगी रूग्णालयात आरोग्य तपासणी केली जाणार असून यामध्ये स्त्री रोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचारोग, मानसिक आजार, दंत शल्यचिकित्सक आदी सेवा देण्यात येणार आहेत. आयुष्यमान भव अंतर्गत ग्रामपातळीवर आयुष्यमान सभा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तर आभा कार्ड आयुष्यमान कार्ड आदींची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर केली जाणार आहे. आयुष्यमान भव मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी केले आहे.