तेव्हा गेलो नाही, आता जाण्याचा प्रश्नच नाही, रत्नागिरीचे कार्यकर्ते पवारांच्या पाठीशी ठाम !
रत्नागिरी :- जेव्हा स्थानिक आमदार दुसऱ्या पक्षात गेले तेव्हा आम्ही कुठे गेलो नाही. आताच्या राजकीय घडामोडीमुळे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही आमचे नेते शरद पवार यांच्याबरोबरच राहणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांचे सुमारे ४० आमदार फुटून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यापैकी ९ जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था आहे. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गुहागरात वेगळी परिस्थिती आहे. याबाबत रत्नागिरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये तालुका आणि रत्नागिरी शहर राष्ट्रवादीने शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले म्हणाले, जेव्हा स्थानिक आमदार शिवसेनेत गेले तेव्हा आम्ही गेलो नाही. शरद पवारांबरोबरच राहिलो. आता राज्यात मोठी घडामोड झाली असली तरी शहर राष्ट्रवादी शरद पवारांबरोबरच राहणार. याबाबत मुंबईत लवकरच राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. त्यामध्ये आणखी पक्षाची भूमिका स्पष्ट होईल.
राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीवर आमचे लक्ष आहे; परंतु आम्ही शरद पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही संपूर्ण तालुका शरद पवारांबरोबरच राहणार असे राजन सुर्वे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रत्नागिरी यांनी म्हटले आहे .